Biparjoy Cyclone : वादळाची तीव्रता वाढली, महाराष्ट्र आणि गुजरातच्या ‘या’ भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता !

Biparjoy Cyclone : यावर्षी अगदी सुरुवातीलाच भारतीय हवामान विभागाने मान्सूनचे आगमन भारताच्या मुख्य भूमीत म्हणजेच केरळमध्ये उशिराने होणार असा अंदाज बांधला होता. अशातच अरबी समुद्रामध्ये या वर्षातील पहिल चक्रीवादळ तयार झालं. यामुळे मान्सूनचे आगमन खूपच लांबणार असं मत व्यक्त केलं जात होतं.
यानुसार केरळमध्ये मान्सूनचे आगमन जवळपास सहा ते सात दिवस उशिराने झाले. केरळमध्ये मान्सून सात जूनला पोहोचला आणि तेथून चार दिवसात अर्थातच 11 जूनला मान्सूनचे तळ कोकणात अर्थातच दक्षिण कोकणात आगमन झाले. आता मान्सूनसाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून आगामी 48 तासात संपूर्ण महाराष्ट्रभर मानसून पसरणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान हवामान विभागाच्या माध्यमातून अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाबाबत देखील एक महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, वादळाची तीव्रता वाढली आहे. शिवाय वादळाची दिशा बदलली असून गेल्या बारा तासात हे वादळ उत्तरेकडे सरकले आहे. तसेच आज 12 जून रोजी सकाळी हे अरबी समुद्रातील वादळ पोरबंदरपासून सुमारे 340 किमी, देवभूमी द्वारकेपासून 380 किलोमीटर नैर्ऋत्येस, जाखाऊ बंदरापासून 460 किमी दक्षिणेकडे होते.
या चक्रीवादळामुळे मात्र गुजरात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता तयार होत आहे. या वादळामुळे मुंबईमध्ये आणि उत्तर कोकणात पावसाची शक्यता आहे. तसेच समुद्रकिनाऱ्यावर उंच लाटा उसळत आहेत आणि समुद्राला भरती आल्याने पाण्याची पातळी देखील वाढली आहे.
शिवाय या वादळामुळे किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. यामुळे नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुजरात मध्ये देखील या वादळाचा परिणाम जाणवणार आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये या वादळाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात 15 जून पर्यंत किनारपट्टी पासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला असून पुढील चार दिवस गुजरातमध्ये या वादळामुळे पावसाची शक्यता तयार होत आहे.
पुढील चार ते पाच दिवस सौराष्ट्र, कच्छ, दिव मध्ये वादळी वारे वाहणार आहेत आणि गुजरातच्या किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडणार आहे. हे वादळ आता येत्या काही दिवसात गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. गुजरातच्या पोरबंदर पासून 510 किलोमीटर अंतरावर आणि मुंबईपासून सहाशे किलोमीटर अंतरावर हे वादळ सद्यस्थितीला आहे.
दरम्यान, बिपरजॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, कोकण आणि गोवा किनारपट्टीलगतच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. मात्र या वादळाचा कुठलाच थेट परिणाम भारतीय किनारपट्टीवर होणार नाही असा दावा काही हवामान तज्ञ लोकांनी केला आहे. सध्या हे वादळ उत्तरेकडे सरकत असून याची तीव्रता वाढत आहे. अरबी समुद्राचे तापमान वाढले असल्याने ही तीव्रता आज पर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.