अहमदनगर

शासकीय तांदळाची काळा बाजारात विक्री; पोलिसांच्या छाप्यात 53 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर- शासकीय तांदुळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रक शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेतला. यामधून 40 टन तांदळासह 53 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

बाळू सूर्यभान कोकाटे (25,रा.झापेवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड (ट्रक चालक), प्रवीण अशोक ढोले, (रा.गाडेवादी ता .पाथर्डी, जि.अहमदनगर) (क्लिनर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पो.नि. विलास पुजारी यांना नेवासा रोडने ट्रक क्र. (एमएच 16, सीडी 7180) मध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी रेशनचा माल जाणार असल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली. या माहितीवरुन पुजारी यांनी पथक रवाना केले होते. धर्मात्मा पेट्रोल पंप शेवगाव-नेवासा रोड येथे मध्यरात्री 12.45 वा. पोलीसांनी सबंधीत ट्रक ताब्यात घेतला. तर चौकशी करून चालक बाळू कोकाटे व क्लिनर प्रवीण अशोक ढोले या दोघांना ताब्यात घेतले. तसेच ट्रक चालकाने स्वस्त धान्य दुकानाचा शासकीय तांदुळ रेणुकानगर येथील भिमा मारुती गायकवाड याचे घरात साठा केलेला होता. या घराची झडती घेतली असता तेथे दोन खोल्यामध्ये स्वस्त धान्याचा शासकीय तांदुळचा साठा आढळुन आला. तेथे पोलीस गार्ड नेमण्यात आला आहे.

 

सदर स्वस्त धान्य शासकीय तांदळाची चोरटी वाहतुक करुन चढ्या भावाने बाजारात विक्री करण्यासाठी इतर जिल्हयात व आंतरराज्यात सदरचा तांदुळ विक्री होत असावा अशी दाट शक्यता आहे. यामध्ये कोणकोणते व्यापारी, दुकानदार व व्यावसायीक सहभागी होते याबाबत पोलीस माहिती घेत आहोत. निवासी नायब तहसिलदार राहुल पोपट गुरव यांचे सुचनेप्रमाणे त्यांचे उपस्थितीत पुरवठा अधिकारी चव्हाण हे सदरचा तांदुळ मोजमाप करुन पंचनामा करीत आहेत.

 

या छाप्यामध्ये अंदाजे 40 टन वजनाचा 9 लाख रूपये किंमतीचा शासकीय तांदुळ व 44 लाख रूपये रुपये किंमतीचा ट्रक असा एकुण अंदाजे 53 लाख रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल, विश्वास पावरा, आशिष शेळके, कर्मचारी बाबासाहेब शेळके, प्रविण बागुल, सोमनाथ घुगे, अशोक लिपणे, संतोष काकडे, अमोल ढाळे, शितल गुंजाळ यांनी ही कामगिरी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button