युवतीला ब्लॅकमेल करत तीन लाखांची खंडणी मागितली; दोघांविरूध्द गुन्हा

मोबाईलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीकडे तीन लाख रूपयांची खंडणी मागितली. भिंगार शहरात ही घटना घडली असून पीडित युवतीने भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.
तिने दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली विधाटे (मुळ रा. नांदुर ता. आष्टी जि. बीड) व रोहिणी रावसाहेब गवळी (रा. कापुरवाडी ता. नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी फिर्यादीच्या मोबाईलवर फोन केला व म्हणाले,‘तुझ्या सोबत काढलेले फोटो व्हायरल करू, फोटो व्हायरल करायचे नसल्यास तीन लाख रूपये द्यावे लागतील’, असे म्हणत खंडणीची मागणी केली.
फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार देत आरोपींचे मोबाईल नंबर ब्लॉक केली. आरोपींनी फिर्यादीच्या होणार्या पतीसह मित्राच्या मोबाईलवर फोटो टाकून बदनामी करत धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक बी. पी. गायकवाड करीत आहेत.