मिटकरींविरोधात अहमदनगरमध्ये ब्राह्मण सेवा संघ आक्रमक; पुतळ्याचे दहन, गुन्हा दाखल करण्याची मागणी

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे सामुहीक कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाविषयी तेढ निर्माण होईल,
असे वक्तव्य करुन ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा ब्राम्हण सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान अहमदनगर शहरातील पटवर्धन चौकात आ. मिटकरी यांच्या प्रतिकात्कम पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी मयूर जोशी, किशोर जोशी, अक्षय चिंधाडे, नरेंद्र खिस्ती आदी उपस्थित होते.
सुरूवातीला ब्राह्मण सेवा संघाचे पदाधिकारी किशोर जोशी, भाजपचे शहराध्यक्ष भैया गंधे, विश्व हिंदू परिषदेचे मुकुल गंधे, मनसेचे सचिन डफळ, नितीन भुतारे आदी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गेले होते.
तेथे फिर्याद घेण्यास नकार देण्यात आल्यानंतर ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. मात्र यावेळी एकही वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले.
मिटकरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान हा प्रकार सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हेही अधीक्षक कार्यालयात दाखल झाल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. आ. जगताप यांनी मिटकरी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.