संगमनेर पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना रंगेहाथ अटक

संगमनेर तालुक्यातील पंचायत समितीमध्ये ठेकेदाराकडून कनिष्ठ अभियंता संजय गोविंदराव ढवण रा. श्रीरामपूर यांनी १९ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, एका शासकीय कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे या कनिष्ठ अभियंता बाबत तक्रार केली होती. संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील एका समाजाच्या स्मशानभूमीच्या वॉल कंपाऊंडचे सुशोभीकरणाचे काम या कंत्राटदाराने केले होते.
या कामाची पाहणी करून, एम बी करून देण्याच्या मोबदल्यात सदर कामाची रक्कम तीन लाख रुपये असून त्या रकमेच्या पाच टक्के प्रमाणे 15 हजार रुपये तसेच क्वालिटी कंट्रोल चे 4 हजार रुपये असे एकूण 19 हजार रुपये लाचेची मागणी आरोपी ढवण याने सदर तक्रारदाराकडे केली होती.
त्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केल्यानंतर या खात्याच्या पथकाने सापळा रचून पंचायत समिती कार्यालय येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कक्षात 19 हजार रुपयांची लाच घेताना या अभियंत्यास रंगेहाथ पकडले.
पोलीस अधीक्षक संजय कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. लाचखोर अभियंता याची सखोल चौकशी सुरु आहे.