पुणे जिल्ह्यातून आलेल्या ‘बंटी बबली’ जोडीला अहमदनगरमध्ये अटक !
तो पत्नीसह मोटारसायकलवरून सोलापूररोडने नगरला चोरीचे दागिने विक्रीसाठी घेऊन येणार आहे, अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती

शिरुर येथे घरफोडी करून चोरीचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी अहमदनगरमध्ये घेऊन येत असलेल्या अट्टल दरोडेखोराला पत्नीसह गुन्हे शाखेने चांदणी चौकात अटक केली. आरोपींना शिरुर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले असून, चोरीच्या दागिन्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
मिलिंद उर्फ मिलन्या ईश्वर भोसले (वय २५ ) व पत्नी कोमल मिलिंद भोसले (वय २० दोघे राहणार बेलगाव, ता. कर्जत) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. हे दोघे पती-पत्नी आहेत. मिलन्या भोसले हा अट्टल दरोडेखोर आहे.
त्याने काही दिवसांपूर्वी शिरुर ( जि. पुणे) परिसरात घरफोडी केली होती. याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याच्याविरोधात नगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडीचे तब्बल १६ गुन्हे दाखल आहेत.
तो पत्नीसह मोटारसायकलवरून सोलापूररोडने नगरला चोरीचे दागिने विक्रीसाठी घेऊन येणार आहे, अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ चांदणी चौकात पथक पाठविले. वेशांतर करून पथक चांदणी चौकात गुरुवारी (दि. २७) रात्री थांबलेले होते.
तेव्हा मोटारसायकलवरून दोन इसम येताना दिसले. यातील महिलेच्या हातात पिशवी असल्याने पोलिसांची खात्री झाली. त्यांनी चालकास थांबविले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन शिरुर पोलिस ठाण्यात हजर केले असून, पुढील तपास शिरुर पोलिस करीत आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेचे सोपान गोरे, सुनील चव्हाण, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, विशाल गवांदे आदींच्या पथकाने केली.
आरोपी मिलिद मिलन्या भोसले याच्याकडे पोलिसांनी चोरीच्या दागिन्याबाबत चौकशी केली. त्याने सुरुवातीला घराच्या शेजारी खड्डा खोदून त्यात दागिने ठेवले असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी तिथे जावून खड्डा खोदला. मात्र त्यात काहीही सापडले नाही. त्यानंतर त्याने भावाकडे दागिने दिले आहेत, अशीही माहिती दिली. पण, त्याच्याकडेही सापडले नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.