सावधान: लग्नासाठी मुलगी देण्याच्या नावाखाली तुमचीही होईल फसवणूक; कारण…

अहमदनगर- लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने अनेकांनी काही करण्याची तयारी केली आहे. याच भावनेच्या भरात देण्याचे आमिष दाखवून अनेकांची आर्थिक फसवणूक होत आहे. फसवणूक करणारे स्नेहालयसह विविध सामाजिक संस्थांची नावे वापरत असल्याचे समोर आले असून, या संदर्भात स्नेहालय संस्थेने सावधानीचा इशारा देत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिले आहे.
औरंगाबाद येथील दोघांची फसवणूक झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद येथील दोघांना एका महिलेने संपर्क साधून ती स्नेहालयमधून बोलत असल्याचे तिने सांगितले. विवाहासाठी मुलगी उपलब्ध असून तिचा परिचय तुम्हाला फोटोसह पाठविण्याकरिता आणि विवाह संबंधाने पुढील प्रोसेस करण्यासाठी सहा हजार रूपये फोन पे द्वारे घेतले. स्नेहालय संस्थेचे नाव घेऊन काही व्यक्ती फोन करून खोटी माहिती देत इतर अनेकांकडून पैसे ऑनलाइन मागून त्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे निर्देशनास आले.
स्नेहालय संस्था ही वधू वर परिचय संमेलन किंवा विवाह जुळवण्याकरिता कुणाकडूनही पैसे घेत नाही. त्यामुळे या संस्थेच्या नावाने फोन आल्यास पोलिसांना माहिती द्यावी. फसवणूक झालेल्या प्रत्येकाने तातडीने संबंधित व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखला करावा, असे आवाहन स्नेहालय संस्थेतर्फे करण्यात आले आहे. याबाबत स्नेहालय संस्थेने नगर जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.