Chandrayaan 3 Live : चांद्रयान-३ आता कुठे आहे ? चंद्रावर कधी उतरणार ? वाचा सर्व माहिती
Chandrayaan 3 Live: Where is Chandrayaan-3 now? When will you land on the moon? Read all information

Chandrayaan 3 :- भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान- ३ ‘ने बुधवारी चंद्राच्या पाचव्या आणि अंतिम कक्षेत यशस्वी प्रवेश केला. यानंतर आता आज गुरुवारी प्रणोदन मॉड्यूल आणि लँडरला वेगळे करण्याची योजना आहे.
ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर येत्या २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यानाचे सॉफ्ट लैंडिंग केले जाईल. ही मोहीम यशस्वी ठरली तर अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरेल .
चांद्रयान आता चंद्राभोवती किमान १५३ किमी आणि कमाल १६३ किमीवरून प्रदक्षिणा घालत आहे. यासोबतच चंद्राच्या सीमेत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने सोशल माध्यम एक्सवरून दिली.
यानंतर १७ ऑगस्ट रोजी चांद्रयानाच्या प्रणोदन मॉड्यूलपासून लँडर मॉड्यूल वेगळे करण्याची योजना आहे. लँडर आणि रोव्हर असलेले लैंडिंग मॉड्यूल हे प्रणोदन मॉड्यूलपासून विभक्त होऊन डिबूस्ट म्हणजे वेग कमी करून ते चंद्रावर उतरवण्यात येणार आहे.
लैंडिंग मॉड्यूल परिभ्रमण करत असतानाच चंद्राच्या पृष्ठभागापासून किमान ३० तर कमाल १०० अंतराच्या कक्षेत नेण्यात येईल आणि तेथून ते सरळ चंद्रावर उतरवण्याची प्रक्रिया सुरू होईल.
हा टप्पा सर्वांत आव्हानात्मक आहे. चांद्रयान- २ मोहीम याच टप्प्यावर अपयशी ठरली होती. चांद्रयान-२ चा वेग नियंत्रित न झाल्यामुळे त्याचे चंद्रावर सॉफ्ट लैंडिंग होण्याऐवजी ते आदळले आणि त्याचा संपर्क तुटला होता. यातून घडा घेत इस्रोने यावेळी या टप्प्यासाठी चांगलीच तयारी केली आहे.
अंतिम टप्पा थोडासा बिकट
१४ जुलै रोजी प्रक्षेपण केल्यापासून चांद्रयान- ३ ने आतापर्यंतचा प्रवास कोणत्याही अडथळ्याविना यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आता अंतिम टप्या बिकट असल्याने सर्वांचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे.
प्रक्षेपणानंतर यानाने पृथ्वीची कक्षा पाच टप्प्यांत मागे टाकत ५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. त्यानंतर ६ ऑगस्ट, ९ ऑगस्ट आणि १४ ऑगस्टला चांद्रयानाची परिभ्रमण कक्षा यशस्वीरीत्या कमी करण्यात आली होती. येत्या २३ ऑगस्ट रोजी चांद्रयानाचे चंद्रावर सॉफ्ट लैंडिंग करण्याची इस्रोची योजना आहे.