अहमदनगर

‘त्या’ गोल्ड व्हॅल्युअरविरूध्द दोषारोपपत्र दाखल

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोने तारणप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपीविरूध्द आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेवगाव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

गोल्ड व्हॅल्युअर विशाल गणेश दहिवाळकर (रा. शेवगाव) असे त्या आरोपीचे नाव आहे. सुमारे 250 पानी दोषारोपपत्रात कर्जदारांकडून बनावट सोने घेऊन ते खरे असल्याचे भासवत त्यांना मूल्यांकन दाखले देऊन बँकेची फसवणूक केल्याचा दोष ठेवण्यात आला आहे.

दरम्यान या गुन्ह्यात 159 कर्जदार आरोपी असून त्यांना अद्याप अटक केलेली नाही. त्यांच्याबाबत भादंवि कलम 173 (8) प्रमाणे तपास सुरू असल्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक ए. आर. आव्हाड यांनी सांगितले.

शेवगाव शाखेतील बनावट सोने तारणप्रकणी गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकरसह 159 कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेवगाव शाखेचे व्यवस्थापक अनिल वासुमल आहुजा यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सन 2017 ते 2021 या कालावधीत गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकर व कर्जदारांनी संगनमत करून बनावट दागिने खरे असल्याचे भासवून मूल्यांकन दाखले देऊन बँकेकडून कर्ज घेतले.

कर्जदारांना वेळोवेळी नोटिसा देऊनही त्यांनी तारण ठेवलेले सोने सोडून घेतले नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी नगर येथे बँकेच्या मुख्य शाखेत या सोन्याचा लिलाव ठेवण्यात आला होता.

मात्र त्यातील सोने बनावट असल्याचे समोर आले होते. मागील चार वर्षांच्या कालावधीत 159 कर्जदारांनी 364 पिशव्यांत 27 किलो 351.10 ग्रॅम सोने बँकेकडे तारण ठेवून सुमारे पाच कोटी 30 लाख 13 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यामुळे बँकेचे गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकर याच्यासह 159 कर्जदारांवर बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button