रंग लावण्यासाठी महिलेचा पाठलाग; शिट्टी वाजवून छेडले अन्

पती-पत्नीचा पाठलाग करून रंग लावण्यासाठी पत्नीची छेड काढणार्या अमोल साबळे, अक्षय साबळे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) या दोन मित्रांविरूध्द तोफखाना पोलिसांत विनयभंग, शिवीगाळ, दमदाटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अहमदनगर शहरात राहणार्या महिलेने फिर्याद दिली आहे.
मंगळवारी रंगपंचमी होती. रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला त्यांच्या पतीसोबत रामवाडीकडून कोठल्याकडे दुचाकीवरून जात असताना अमोल व अक्षय यांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. फिर्यादीकडे पाहून शिट्टी वाजवत, थांब आम्हाला तुला रंग लावायचा आहे, तुझ्यासोबत रंगपंचमी खेळायची आहे, असे म्हणत त्यांचा कोठला स्टँडपर्यंत पाठलाग केला.
तेथे फिर्यादीच्या पतीने दुचाकी थांबविली. अमोल व अक्षय यांना ते म्हणाले, ‘ तुम्ही आमचा पाठलाग का करता, तुम्ही का माझ्या पत्नीला पाहून शिट्टी मारता’, असे विचारल्याचा राग अमोल व अक्षय यांना आल्याने ते फिर्यादीच्या पतीला म्हणाले, आम्हाला तुझ्या बायकोसोबत रंगपंचमी खेळायची आहे, असे म्हणत त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.