कला केंद्रावर सुरू होते छम..छम; पोलीस धडकताच…

अहमदनगर- मोहा (ता. जामखेड) गावच्या शिवारात नव्याने व विनापरवाना सुरू झालेल्या लक्ष्मी नावाच्या कलाकेंद्रावर जामखेड पोलिसांनी छापा टाकून कलाकेंद्राच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला. सुरज बबन मुसळे (32, रा. कान्होपात्रानगर, जामखेड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार संजय लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुकवारी (दि.13) रोजी रात्री 9 वाजेचे सुमारास पोलीस जामखेड-बीड रोडवरील मोहा गावच्या शिवारात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मोहा शिवारात लक्ष्मी नावाच्या कलाकेंद्रात विनापरवाना नृत्याचे कार्यक्रम चालू आहेत. याबाबत माहिती घेतली असता सदरचे कलाकेंद्र नव्याने सुरू झालेले आहे.
पोलीसांनी दोन पंचांसह झडती घेतली असता तेथे असलेल्या विविध लहान- मोठ्या हॉलमध्ये एकूण 12 नृत्यांगणा नृत्य करत असल्याचे व त्यांच्यासमोर 25 ते 30 ग्राहक बसल्याचे दिसून आले. या कलाकेंद्रात नृत्याचा कार्यक्रम चालविणेकरिता आवश्यक असलेला परवाना व्यवस्थापकाकडे नसल्याचे निदर्शनास असल्यानंतर मुसळे विरूद्ध विनापरवाना कला केंद्र चालवल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय साठे करत आहेत.