नगर शहर बँक फसवणूक प्रकरण; आणखी १९ तोळे बनावट दागिणे

अहमदनगर- शहर सहकारी बँकेतील बनावट सोनेतारण प्रकरणाची व्याप्ती वाढतच आहे. कोतवाली पोलिसांनी केलेल्या तपासात आणखी १९ तोळे बनावट दागिणे आढळून आले आहेत. त्यावर ८ लाख ४१ हजारांचे कर्ज घेण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी एकास ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. दरम्यान, एका पतसंस्थेतील खात्यांची तपासणी दोन दिवसात सुरू होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहर बँकेतील बनावट सोनेतारण कर्ज घोटाळा सध्या राज्यभरात चर्चेत आहे. इतरही काही बँका व पतसंस्थाची बनावट सोनेतारण कर्जाच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. सद्यस्थितीत शहर बँकेच्या तपासाला पोलिसांनी गती दिली आहे.
शनिवारी पुन्हा शहर बँकेतील एका कर्ज खात्याच्या तपासणीमध्ये १९१ ग्रॅम म्हणजे १९ तोळे बनावट सोने आढळले आहे. यावर ८ लाख ४१ हजारांचे कर्ज घेण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी संशयित म्हणून अच्युत कानडे (रा. नगर) यास ताब्यात घेतले आहे.
गुरुवारीही अडीच किलो बनावट सोने आढळले होते. त्यामुळे आत्तापर्यंत सुमारे ३५ खात्यांमध्ये ८ हजार ७११.४० ग्रॅम म्हणणे जवळपास पावणे नऊ किलो बनावट दागिने ठेवल्याचे व त्याद्वारे शहर बँकेची सुमारे ३.१७ कोटींची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. गुन्ह्यातील आरोपींची संख्या ३६ वर पोहोचली असून, आणखी एका संशयितास ताब्यात घेतल्याने आरोपींची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, आणखी एका पतसंस्थेतील कर्ज खात्यांची तपासणी येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.