नगर पोलिसांची धडक मोहीम; ‘त्या’ गुन्हेगारांवर केली कारवाई

अहमदनगर- शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांनी कठोर भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी सराईत गुन्हेगार शोधून दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.
शनिवारपर्यंत नगर शहरातील अशा 114 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली. दरम्यान ‘टू-प्लस’ चा आधार घेऊन शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांवर अशा कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मकर संक्रांतीच्या दिवशी मंगलगेट परिसरातील जे.जे. गल्लीत दोन गटांमध्ये वाद होऊन दगडफेकीची घटना घडली. यानंतर नगर कॉलेजमध्ये किरकोळ कारणातून दोन गट पुन्हा समोरासमोर आले. अशा एक ना अनेक छोट्या-मोठ्या घटना शहरासह जिल्ह्यात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी कठोर पाऊले उचलली आहेत. शहरातील तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांवर पोलिसांनी प्रतिबंधत्माक कारवाई सुरू केली आहे.
तीन सराईत गुन्हेगारांची माहिती संकलीत केली असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना जिल्ह्यातून हद्दपार केले जाणार आहे. त्यांचा हद्दपारीचा प्रस्ताप पोलिसांकडून तयार केला जात आहे. तसेच भादंवि कलम 109 नुसार दोन तर भादंवि कलम 110 नुसार 28 व्यक्तीकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहेत.
दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या 81 व्यक्तींना भादंवि कलम 149 नुसार नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यांच्या हालचालीवर पोलिसांची नजर असणार आहे. दरम्यान आतापर्यंत 114 गुन्हेगारांवर ही कारवाई केली असली तरी यापुढेही अनेकांवर अशा कारवाई केल्या जाणार आहेत, असे अधीक्षक खैरे यांनी स्पष्ट केले आहे.