क्लासेस कार्यालय, मेडिकल आणि पतसंस्था; एकाचवेळी चोरट्यांच्या टार्गेटवर

अहमदनगर- शनिवारी रात्री केडगाव उपनगरात कोचिंग क्लासेसचे कार्यालय फोडून 41 हजार रूपये, मेडिकल फोडून नऊ हजार रूपयांची रक्कम लंपास केेली. तर राजीव गांधी पतसंस्था फोडण्याचा प्रयत्न झाला.
या प्रकरणी मेडिकल मालक चेतन प्रकाश पवार (वय 31 रा. नेप्ती ता. नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन पवार व सागर गोरक्षनाथ ढगे यांचे केडगावातील झेंडा चौकात राजमुद्रा नावाचे मेडिकल दुकान आहे. त्यांनी शनिवारी रात्री 10 वाजता दुकान बंद केले होते. रविवारी सकाळी आठ वाजता दुकानात हार टाकणार्या व्यक्तीने चेतन यांना फोन करून मेडिकलचे शटर उघडे दिसत असल्याचे सांगितले. चेतन यांनी ताबडतोब दुकानात येऊन पाहणी केली असता नऊ हजार रूपयाची रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दरम्यान चेतन यांच्या मेडिकलपासून जवळ असलेल्या राजीव गांधी पतसंस्थेच्या शटरची कडी तोडून चोरीचा प्रयत्न झाला. तसेच तेथून जवळच असलेल्या श्रीकांत पांडूरंग कुलांगे यांच्या कुलांगे लर्निंग हब आणि कोचिंग क्लासेस असलेल्या इमारतीच्या सेफ्टीडोअरची कडी तोडून 41 हजार रूपये चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.