अहमदनगर

पोलिसांचे कोबिंग ऑपरेशन; दोघांना गावठी कट्ट्यासह पकडले

अहमदनगर- दोघांना जिवंत काडतुसे व दोन गावठी कट्ट्यासह पोलिसांनी अटक केली. शुभम जितेंद्र चव्हाण आणि साईनाथ सुनील उबाळे अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे सावळीविहीर येथील असून शिर्डी पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

 

शिर्डीत पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेलची तपासणी, कोबिंग ऑपरेशन, नाकाबंदी केली जात आहे. शहरातील पॉलिसी एजंट यांची धरपकड, रस्त्यावर केलेल्या अतिक्रमण धारकांची धरपकड केली जात आहे. अवैध प्रवासी वाहतूक यावर कडक कारवाई होत आहे. शनिवारी नाकाबंदी करून तपासणी होत असताना सन अँड सँन्ड रोडला रॉयल मेन्स वेअर या दुकानांमध्ये दोन तरुणांकडे गावठी कट्टे असून ते या दुकानात येणार असल्याची माहिती शिर्डी पोलीसांना मिळाली.

 

पोलिसांनी येथे सापळा लावला व या दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता शुभम जितेंद्र चव्हाण यांच्या कमरेला पंचवीस हजार रुपये किमंतीचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे आणि साईनाथ सुनील उबाळे यांच्याकडे पंचवीस हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुसे असे मिळून 51 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल सापडला. गावठी कट्टे व जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली.

 

 

आरोपींना अटक करून पोलीस कॉन्स्टेबल अजय अंधारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरूध्द भारतीय हत्यार कायदा 3/25, कलम 37 (1) (3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना राहता न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button