अहमदनगर

दिलासादायक: लम्पी बाधित मृत जनावरांपोटी शेतकऱ्यांना सहा कोटींचे अनुदान जमा

अहमदनगर- जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून लम्पी या संसर्गजन्य रोगाचा फैलाव सुरू आहे. दरम्यान, आता लम्पी बाधित जनावरांची संख्या कमी होत आहे. आजअखेर जिल्ह्यात 51 हजार 440 लम्पी बाधित जनावरे आढळली असून, त्यातील 3 हजार 674 जनावरांचा मृत्यू झाला आहे. शासनाने लम्पीने जनावराचा मृत्यू झाल्यास शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

लम्पी संसर्गाने जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 674 जनावरांचा मृत्यू झाला असून पशुसंवर्धन विभागाने त्यापोटी शेतकर्‍यांना 5 कोटी 95 लाख 45 हजार रुपयांचे नुकसान भरपाई अनुदान दिले आहे. 3 हजार 120 प्रस्ताव मंजूर झाले असून त्यापैकी 2 हजार 251 प्रस्तावांचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले आहे. उर्वरित प्रस्तावांना अनुदान देण्यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.

 

अनुदानासाठी जिल्हास्तरावर समिती नेमून हे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. आतापर्यंत 2 हजार 251 मदतीचे प्रस्ताव समितीने मंजूर केले आहेत. यापोटी राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने 5 कोटी 95 लाख 45 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. लम्पीने जनावरांचा मृत्यू झाल्यास शासनाने खास बाब म्हणून पशुपालकांना मदत जाहीर केली आहे.

 

त्यानुसार दुभत्या जनावरांना 30 हजार, बैल 25 हजार, तर वासरासाठी 16 हजार रुपयांची मदत दिली जाते. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून संबंधीत शेतकर्‍यांना काही मदत देण्यात आलेली आहे.

 

दरम्यान, सोमवारी लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांच्या आकडा 3 हजार 674 झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत लम्पीची बाधा झालेल्या जनावरांची संख्या 51 हजार 440 झाली असून यातील 44 हजार 669 जनावरांनी लम्पी रोगावर मात केली आहे. जिल्ह्यातील 221 गावांत सध्या लम्पी रोगाने बाधित जनावरे आहेत. पशूसंवर्धन विभागाने आतापर्यंत 15 लाखांहून अधिक जनावरांचे लसीकरण केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 674 जनावरांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 2 हजार 251 प्रस्ताव मंजूर होऊन त्याचे 5 कोटी 95 लाख 45 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.

 

याशिवाय 880 प्रस्ताव मंजूर असून त्याचे अनुदान लवकरच वितरीत होणार आहे. त्यासाठी पशुसंवर्धनने शासनाकडे 2 कोटी 17 लाखांची मागणी केली आहे.

 

कंत्राटी कर्मचार्‍यांचे पगार थकले

 

लम्पीचा संसर्ग जिल्ह्यात वाढत असताना पशुसंवर्धन विभागाने 40 कंत्राटी पशुसंवर्धन कर्मचार्‍यांची नेमणूक केली होती. परंतु गेल्या तीन महिन्यांचे त्यांचे वेतन अद्याप दिले गेले नसल्याने हे सर्व कर्मचारी सोमवारी जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. तातडीने हे वेतन द्यावे, या मागणीचे निवेदन त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button