कंपनीतील नोकरदारच झाले चोर; आठ लाखांच्या मुद्देमालासह पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर- मोबाईल टॉवर कंपनीमध्ये इंजिनिअर व रिगर (मदतनीस) म्हणून नोकरीला असणार्या दोघांनी मोबाईल टॉवर युनिट सिस्टीममधील डीआरयु कार्ड व फिडर केबल चोरी केल्याचे समोर आले आहे. इंजिनिअर मन्मत जगन्नाथ पाटील (वय 29 रा. वडगाव, ता. चाकुर, जि. लातुर, हल्ली रा. खंडोबानगर, शेवगाव) व मदतनीस रामकिसन हरीभाऊ तांदळे (वय 27 रा. गुंळज, ता. गेवराई, जि. बीड) अशी त्यांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून डीआरयु, फिडर केबल व चारचाकी वाहन असा सात लाख 72 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खोसपुरी (ता. नगर) शिवारातील इंडस कंपनीचे आयडीया मोबाईल टॉवर सिस्टीम युनिट मधील तीन अॅल्युमिनियम बॉडी असलेले डीआरयु कार्ड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. या प्रकरणी 23 जून 2022 रोजी गोविंद दत्तात्रय मचाले (वय 48 रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना अहमदनगर जिल्ह्यातील मोबाईल टॉवरचे डीआरयु, फिडर केबल व बॅटरी चोरी केलेले साहित्य मन्मत पाटील व त्याचा साथीदार शेवगाव येथील भंगार दुकानामध्ये विक्री करण्यासाठी घेवुन येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार भाऊसाहेब कुरूंद, विशाल दळवी, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, आकाश काळे व शिवाजी ढाकणे यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
पथकाने शेवगाव येथे जावुन मिळालेल्या माहिती वरून भंगार दुकानदारांकडे जावुन माहिती घेत असताना काही इसम लांडेवस्ती येथे चोरीचा माल विक्री करण्यासाठी आले बाबत माहिती प्राप्त होताच पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नमुद ठिकाणी जावुन मन्मत पाटील, रामकिसन तांदळे यांना ताब्यात घेतले. त्यांनी सदर गुन्ह्याची कबूली दिली.
नगर तालुका व पाथर्डी परिसरातील मोबाईल टॉवर सिस्टीम युनिटमध्ये अशा प्रकारचे साहित्य चोरी केल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे.