अहमदनगर

नगरच्या ‘या’ बँकेची ईडी, इन्कमटॅक्सकडे तक्रार होणार; कोणी घेतला पुढाकार?

अहमदनगर- नगर अर्बन बँकेतील 150 कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात 17 फेब्रुवारी 2022 रोजी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. या गुन्ह्याचे स्वरूप मोठे असल्यामुळे तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार मुंबई येथील सनदी लेखापाल फर्म मे. डी. जी. ठकरार यांना या गुन्ह्याचे फॉरेन्सिक ऑडीट करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे.

 

दरम्यान या आर्थिक घोटाळ्याची चौकशी सक्तवसुली संचालनालय (ईडी) व प्राप्तिकर विभाग (इन्कमटॅक्स) यांच्याद्वारे होण्यासाठी येथील नगर अर्बन बँक बचाव कृती समिती तक्रार करणार आहे. घोटाळ्याची फॉरेन्सिक चौकशी सुरू असून, या ऑडिट रिपोर्टच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. हा अहवाल आल्यानंतर ईडी व प्राप्तिकर विभागाकडे बँकेच्या घोटाळ्यांची तक्रार केली जाणार आहे, असे बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी सांगितले.

 

नगर अर्बन बँकेच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी संचालक मंडळावर निश्‍चित व्हावी, बँकेला फसवून झालेल्या कर्ज प्रकरणांच्या एक रकमी परतफेडीत देखील घोटाळे झाले असल्याने त्यांची चौकशी व्हावी तसेच 2014 नंतरचे बँकेचे चेअरमन, संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे आर्थिक व्यवहार व मालमत्ता याची तपासणी आयकर खाते व ईडीकडून व्हावी यासाठी आता बँक बचाव समिती पाठपुरावा करणार आहे व फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट हा त्यासाठी महत्वपूर्ण पुरावा राहणार आहे, असा दावाही माजी संचालक गांधी यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button