अहमदनगर

हाॅटेल चालू करण्याचा वाद; थेट तरूणाचा खूनाचा प्रयत्न

अहमदनगर- हॉटेल चालू करण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीचे पर्यासन हाणामारीत झाले. या हाणामारीत तरुणास लाकडी व लोखंडी दांडक्याने मारहाण करुन त्यास जबर जखमी केले. तरुणावर नगरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रीरामपुरातील गोंधवणी रोडवर असणार्‍या बाबा पेट्रोल पंपाशेजारील ही घटना घडली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 8 ते 9 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

श्रीरामपूर शहरानजीकच असलेल्या गोंधवणी रोडवर दिपक काळे याचे बाबा पेट्रोल पंपाशेजारी मातोश्री हॉटेल आहे. हे हॉटेल चालू करायचे म्हणून दोन तीन दिवसांपासून हॉटेलची साफसफाई सुरू असताना शेजारी राहणारे दत्तात्रय पठारे, बंडू पठारे हे दिपक काळे यास तू हॉटेल चालू करू नकोस म्हणत वाद घालत होते.

 

परंतु, दिपक यास हॉटेल चालू करायचे असल्याने आम्ही साफसफाई करत असताना काल 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ला दिपक काळे व त्याचे सहकारी हॉटेल उघडून झाडलोट करीत असताना शेजारी असणार्‍या पेट्रोल पंपाचे मालक बाबासाहेब हरिभाऊ लबडे तेथे आले व भक्ती काळे यास आपले झालेले वाद आपसात मिटवून घेऊ, आपण शेजारी राहणारे आहोत, असे म्हणून निघून गेले.

 

मात्र, 12.15 वा. आम्ही सर्वजण हॉटेलसमोर खुर्च्यावर बसलेलो असताना पेट्रोल पंपाकडून हातात लाकडी दांडे, लोखंडी कत्ती, रॉड घेवून आरोपी आले व त्यांनी शिवीगाळ करत ज्ञानेश्वर आसने, मयूर शिर्के यांना हातातील हत्याराने मारहाण केली. त्यावेळी दिपक काळे व भक्ती काळे मध्ये पडून सोडवासोडव करीत असताना दिपक काळेच्या पोटात लाथ मारून खाली पाडले. त्याचवेळी मयूर शिर्के यास हातातील लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले.

 

यात मयूर शिर्के याच्या डोक्यातून प्रचंड रक्त वाहू न लागल्याने त्याला तातडीने साखर कामगार हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला लोणीच्या प्रवरा हॉस्पीटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला काल सोमवारी प्रवरा हॉस्पीटल लोणी येथून नगरच्या मॅक्स केअर हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात श्रीकांत पोपट गावडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी बाबासाहेब हरीभाऊ लबडे, बंडू रखमाजी पठारे, दत्तात्रय रखमाजी पठारे, प्रमोद सोपान शेळके, किरण डांगे, निलेश बाबासाहेब पठारे, रखमाजी पठारे, बाबासाहेब पठारे यांच्याविरूद्ध गुन्हा रजि. नं. 142/2023, भादंवि कलम 143, 147, 148, 149, 307, 324, 323, 504 प्रमाणे, गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button