भाव वाढीच्या आशेने कापूस घरातच पडून; मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- जून-जुलैमध्ये समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीपातील तूर, मका, सोयाबीन, बाजरीबरोबर कापूस हे नगदी घेतले. कपाशी जोमात वाढली, परंतु परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला अन् दिवाळी सणाच्या काळात वेचणीस आलेला कापूस खराब झाला. इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले.
पाऊस उघडल्यावर १० ते १२ रुपये प्रति किलोप्रमाणे खर्च करत वेचणी केली. भाव वाढ होईल या आशेने कापूस साठवून ठेवला. पण जानेवारी संपत आला तरी अजूनही अपेक्षित भाववाढ न झाली नाही. बराचसा कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. मागील वर्षी गुणवत्तेनुसार १० ते १२ हजार रुपयांपर्यंतचे भाव देणारा कापूस यंदा मात्र नऊ हजारापर्यंतच पोहोचला आहे.
त्यामुळे यंदा अपेक्षित भाववाढ होत नसल्याने शेतकऱ्यांनी गरजेपुरता कापूस विकला. दरवर्षी दसरा-दिवाळी सणापासून सुरू झालेली कापूस विक्री जानेवारीपर्यत मोठी आर्थिक उलाढाल करून जातो. यंदा परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. एकरी उत्पन्नात मोठी घट झाली.
१० ते १२ किलोने वेचणी करत शेतातील कापूस वेचणी केली. गजरेपोटी काही कापूस विकला आहे तरी अपेक्षित भाव मिळेल या आशेने काही कापूस ठेवला आहे. शेतीमालाचा वाढता उत्पादन खर्च व मिळणारा भाव यामुळे आर्थिक ताळमेळ घालणे अवघड होत चालले आहे.- राजेंद्र मिसाळ, शेतकरी, भेंडे