कापूस, सोयबीनला मिळतोय कमी दर; शेतकरी संतप्त

अहमदनगर- खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून शेतकरी कापूस व सोयाबीन पिकाकडे वळला होता. श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन व कापूस पिकवला जातो. त्यातून दोन पैसे पुढील पिकांच्या खर्चासाठी शिल्लक राहतील, अशी शेतकर्यांची अपेक्षा असते. मात्र बाजारपेठेचे गणित बिघडले की शेतकर्याच्या अपेक्षांवर पाणी फिरते. अगदी असेच काहीसे यंदा कापूस पिकाबाबत होताना दिसत आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीन व कापूस पिकाला चांगला भाव मिळेल या आशेने शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस तसेच सोयाबीनची पेरणी केली. मात्र यावर्षी सुरुवातीला सोयाबीन 6 हजारांच्यावर तर कापसाला 10 हजारांचा भाव मिळत होता. परंतु सध्या सोयाबीन 5 हजार 300 तर कापसाला सध्या 7 हजार 900 च्या आसपास प्रति क्विंटलचा दर मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाला आहे.
या हंगामाच्या प्रारंभी कापसाला प्रति क्विंटलला साडे नऊ ते दहा हजारांच्या आसपास भाव मिळत होता. सध्या बाजारपेठेत आवक घटलेली असतानाही कापसाचे दर पडले आहेत. सोयाबीन व कापसापासून तयार होणार्या सरकी पेंडीचे व खाद्य तेलाचे बाजारभाव कमी झाल्याचा कापसाच्या दरावर परिणाम होत असल्याचे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. आगामी काळात कापसाचे दर 7 हजार 500 रुपयांपर्यंत घसरण्याची भीतीही आता व्यक्त केली जात आहे.
पिकांच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत वाचविलेले सोयाबिनच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीची मदत अद्याप तर नाहीच परंतु सोयाबीन व कापसाच्या कमी भावामुळे अस्मानी संकटाबरोबरच सरकारी संकटाचा देखील सामना शेतकर्यांना करावा लागत आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर, रामफर, जाफराबाद, नायगाव, मातुलठाण, सराला-गोवर्धन, माळेवाडी, महांकाळ वाडगाव आदी गोदावरी भागात अनेक शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात साठविलेला कापूस विकून टाकत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मोठ्या शेतकर्यांनी अद्यापही चांगला दर मिळेल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर कापूस साठवून ठेवला आहे. मात्र अल्पभूधारक शेतकर्यांना पुढील मशागतीच्या हेतुमुळे कापसाची विक्री कमी भावात करावी लागत असल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.