विवाहितेच्या छळप्रकरणी जादुटोणाविरोधी गुन्हा; मांत्रिक व पतीसह सहा…

तू अपशकूनी व पांढऱ्या पायाची आहे. तुझ्यामुळे तूझी सासू मृत झाली, असे आरोप करून नव विवाहित तरुणीचा छळ करण्यात आला. ती घरातून निघून जाण्यासाठी तिच्यावर जादुटोणा केला.
याप्रकरणी श्रीरामपूर येथील डाॅक्टर व मांत्रिकासह सहा जणांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जादुटोणा संदर्भात राहुरी पोलिस ठाण्यात हा पहिलाच गुन्हा दाखल झाला.
येवले आखाडा येथील तरुणीचा विवाह २०२० मध्ये डाॅ. विकास विश्वनाथ लवांडे (कारेगाव ता. श्रीरामपूर) याच्याशी झाला. श्रीरामपूर येथील कारेगाव येथे तिच्या सासरी नांदत असताना तिची सासू ब्रेन ॲटकने मृत झाली होती.
त्यानंतर सासरच्या लोकांनी विवाहितेला तू अपशकूनी व पांढऱ्या पायाची आहे. तू येथे नांदायला आल्यामुळेच तूझी सासू मृत झाली. असे आरोप करून तिचा छळ सुरू केला.
तिच्या सासरच्या लोकांनी मांत्रिकाला बोलावून विवाहितेवर काळा जादुटोन्यासारखा प्रकार सुरू केला. विवाहितेच्या वडिलानी अंनिसचे महेश थनवटे यांना हा प्रकार सांगितला.
याप्रकरणी पती डाॅ. विकास विश्वनाथ लवांडे, सासरा विश्वनाथ रखमाजी लवांडे, नणंद पुनम विश्वनाथ लवांडे (कारेगाव), किशोर सीताराम दौड, प्रमिला किशोर दौड (मातापूर) व मांत्रिक या सहा जणांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात जादुटोणाविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला.