बाबा.. अंकलने मम्मीला मारले ! खिश्यातुन पैसे घेतल्याचा राग आला आणि अहमदनगर जिल्ह्यातील ‘ते’ कुटुंब उध्वस्त झाले…
घरात किराणामाल आणण्यासाठी पैसे नसल्याने सीमा मुलीला सोबत घेऊन पती बसलेल्या ठिकाणी गेली होती. तिने पतीच्या खिशातून चारशे रुपये काढून घेतले. त्यामुळे सीमा व पतीचा वाद झाला....

जामखेड : साकत (ता. जामखेड) येथे रविवारी (दि. ८) रात्री आठच्या सुमारास भावजयीचा खून करणाऱ्या दिराला काही तासांतच जामखेड पोलिसांनी अटक केली.
सीमा बाळू घोडेस्वार (वय ३५, रा. साकत, ता. पाथर्डी) असे खून झालेल्या भावजयीचे नाव आहे. दीर अतुल अरुण घोडेस्वार यासह महिलेचा पती बाळू अरुण घोडेस्वार या दोघांना पोलिसांनी अटक केली.
घरात किराणामाल आणण्यासाठी पैसे नसल्याने सीमा मुलीला सोबत घेऊन पती बसलेल्या ठिकाणी गेली होती. तिने पतीच्या खिशातून चारशे रुपये काढून घेतले. त्यामुळे सीमा व पतीचा वाद झाला.
याचा राग मनात धरून दीर अतुलने भावजयीचा खून केल्याचे समोर आले आहे. याबाबत विवाहितेचे वडील राजेंद्र आश्रुबा सरोदे (४९, रा. पारगाव घुमरा, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
सीमा हिचा पंधरा वर्षांपूर्वी साकत येथील बाळू अरुण घोडेस्वार याच्याशी विवाह झाला होता. बाळू घोडेस्वारला दारूचे व्यसन आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून पती बाळू व दीर अतुल घोडेस्वार हे दोघे सीमास माहेराहून पैसे आणण्यासाठी तगादा लावत होते.तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते. मारहाण करत होते. तसेच अनेक वेळा उपाशी ठेवत होते, असे ती माहेरी आल्यावर सांगत होती, असे सरोदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
रविवारी रात्री सीमाची मुलगी दीक्षा हिने आजोबा राजेंद्र सरोदे यांना फोन केला. ‘अंकलने (अतुल) मम्मीला खूप मारले आहे. ती बेशुद्ध पडली आहे. असे सांगितले. त्यानंतर सरोदे हे मुलासह साकतला आले. ते आल्यावर त्यांना समजले की सीमाला अंकुश घोडेस्वार व इतर नातेवाइकांनी जामखेडला दवाखान्यात नेले आहे.
तेथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले की डोक्याला खूप मार लागला आहे. सरोदे यांनी सीमाला शासकीय दवाखान्यात नेते. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काही तासातच सोमवारी (दि. ९) सकाळपर्यंत कारवाई करत आरोपी अतुल अरुण घोडेस्वार, बाळू अरुण घोडेस्वार यांना अटक केली.