अहमदनगर

दिवसा करायचा घरफोड्या; एलसीबीने अशा आवळल्या मुसक्या

अहमदनगर- चोरीचे सोने विक्री करण्यासाठी नगरकडे घेऊन येताना नगर-जामखेड रोडवरील चिंचोडी पाटील (ता. नगर) शिवारात पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे 23 गुन्हे दाखल असलेला व नगर तालुक्यात दिवसा घरफोडी करणार्‍या सराईत गुन्हेगाराला पकडलेे. दरम्यान त्याचा साथीदार पसार झाला आहे. प्रविण ऊर्फ भाजी हबाजी भोसले (वय 25 रा. पिंपरखेड ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. मुकेश उग्रिसेन ऊर्फ उग्रॉ भोसले (रा. साबलखेड ता. आष्टी, जि. बीड) हा पसार झाला आहे.

 

प्रविण भोसलेकडून तीन लाख 15 हजार रूपये किंमतीचे 63 ग्रॅम सोने, एक लाख 12 हजार 500 रूपयांची रोख रक्कम, 50 हजार रूपये किंमतीची दुचाकी व 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल असा चार लाख 87 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

प्रविण भोसलेने नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चार घरफोड्यांची कबूली दिली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस अंमलदार सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, संदीप घोडके, रवी सोनटक्के, भिमराज खर्से, विनोद मासाळकर, योगेश सातपुते, संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button