अहमदनगर

कर्जाच्या दबावाखाली असलेल्या शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

 एका शेतकर्‍याने विषारी कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे घडली आहे. रमेश गणपत म्हसे (वय 55, रा. कोंढवड) असे मृताचे नाव आहे.

दरम्यान मयत रमेश म्हसे यांच्यावर पतसंस्थेचे कर्ज होते. थकीत कर्जामुळे त्यांना न्यायालयाच्या नोटिसा आल्या होत्या. त्यामुळे दोन महिन्यांपासून ते तणावात होते,असे समजते. तसेच एका पतसंस्थेच्या कर्जाला कंटाळून रमेश म्हसे यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे मृताच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, कोंढवड येथे राहत्या घराच्या शेजारी गाईच्या गोठ्यात रमेश म्हसे यांनी विषारी किटकनाशक प्राशन केले. त्यांना उलट्या सुरू होऊन त्रास जाणवू लागल्यावर त्यांच्या पत्नी व बंधूच्या लक्षात आले.

घरातील नातेवाईकांनी त्यांना तातडीने नगर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी हलविले. परंतु उपचारादरम्यान शनिवारी (ता. 16) दुपारी दीड वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button