सोशल मीडियावर साईबाबांची बदनामी; ‘त्या’ स्वामीसह तिघांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर- करोडो साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांविषयी समाज माध्यमावर बदनामीकारक खोटे वक्तव्य करून असंख्य साईभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून हैदराबाद येथील एका स्वामीसह अन्य दोघांवर शिर्डीच्या पोलीस ठाण्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यामुळे साईभक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. साईभक्त शिवाजी अमृतराव गोंदकर यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले की, तक्रारदार शिवाजी गोंदकर यांच्या मोबाईलवर दि. 31 जानेवारी रोजी 12 वाजेच्या सुमारास यूट्युब या माध्यमावर साईबाबांविषयी बदनामीकारक खोटे वक्तव्य करण्यात आले होते.
ते वक्तव्य गिरधर स्वामी, हिरालाल श्रीनिवास काबरा रा. हैदराबाद, व्हिडिओ काढणारा अज्ञात इसम अशा तिघांनी हा संबंधित बदनामीकारक मजकूर प्रसारित केला होता.
यातून तक्रारदार यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या. गिरधर स्वामी यांनी हिंदू मुस्लिम धर्मात तेढ निर्माण होईल,असे वक्तव्य केले आहे. असे वक्तव्य असलेला व्हिडीओ यूट्युब या माध्यमावर प्रसारित केला आहे.
यावरून त्या तिघांवर धार्मिक तेढ निर्माण केल्याचा व साईबाबांविषयी बदनामीकारक वक्तव्य प्रसारित केल्याचा गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक कोकाटे करीत आहे.