सोशल मीडियावर तरूणीची बदनामी; युवकाला अटक

तरूणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाऊंट तयार करून बदनामी करणारा युवक तेजस भिवसेन ठाणगे (वय 21 रा. तलाठी कार्यालयाशेजारी, सावेडी गाव) याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
तरूणीच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांत भादंवि कलम 500 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, अरूण सांगळे, वासुदेव शेलार यांच्या पथकाने गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण केले.
बनावट अकाऊंट तयार करून फिर्यादी तरूणीची बदनामी करणारा आरोपी ठाणगे यांचे नाव तपासाअंती समोर आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दरम्यान सोशल मीडियावरील व्हाट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबुक अकाऊंट हे प्रायव्हसी लॉक करावे, अनोळखी व्यक्तींची फें्रड रिक्वेस्ट स्विकारू नये, असे आव्हान सायबर पोलिसांनी केले आहे.