धनगर बांधवांकडून सरकारचे पुतळा दहन ! उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक
या वेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच वटहुकुम निघाला नाही तर यापुढे महाराष्ट्रात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर बांधवांनी दिला आहे.

गेल्या दहा दिवसांपासून चौंडी येथील उपोषणाची दखल न घेतल्याने तसेच पालकमंत्र्यांनी चौंडी येथील दौरा रद्द केल्याच्या निषेधार्थ धनगर बांधवांनी अहमदनगर – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे राज्य सरकाराच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध केला.
या वेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच वटहुकुम निघाला नाही तर यापुढे महाराष्ट्रात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर बांधवांनी दिला आहे.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी यशवंत सेनेच्यावतीने चौंडी येथे आण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर हे गेल्या दहा दिवसांपासून उपोषणास बसले आहेत.
या उपोषणास महाराष्ट्रातील विविध पक्ष, संघटनांचा पाठींबा वाढत आहे. मात्र राज्य सरकारने अद्याप दखल घेतली नाही. तसेच पालकमंत्री आंदोलनाकडे फिरकलेच नाहीत, त्यामुळे धनगर बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
दरम्यान, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांना भेटण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा आयोजित केला होता. मात्र सकाळी ऐनवेळी हा दौरा रद्द करण्यात आला.
त्यातच उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे, तरीदेखील सरकारचे मंत्री या ठिकाणी फिरकले नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने पुढे उपोषणाची दखल न घेतल्यास महाराष्ट्रात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर बांधवांनी दिला आहे.