अहमदनगर

जिल्हा पोलिसांकडून 17 जुलैला रोजगार मेळाव्याचे आयोजन; ‘या’ तरूणांना संधी

अहमदनगर – जिल्हा पोलीस दलातर्फे 17 जुलै रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे अयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान पेमराज सारडा महाविद्यालय येथे विविध खासगी कंपन्याचे प्रतिनिधी या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहे.

सध्या कार्यरत असणारे, सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पाल्यांसाठी तसेच होमगार्ड आणि पारधी समाजातील तरूणांसाठी हा मेळावा अयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्र परिषदेत दिली.

अधीक्षक पाटील म्हणाले, पद्मभुषण अण्णा हजारे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्यासह जिल्हातील पोलीस अधिकारी यांच्या उपस्थित रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे पाल्यांबरोबर होमगार्ड यांना स्वत: देखील या मेळाव्यात भाग घेता येणार आहे.

महाराष्ट्रातील पारधी समाजाच्या कोणत्याही ठिकाणी वास्तव्य असणार्‍या तरूणाला भाग घेता येणार आहेत. 12 वी किंवा कोणत्याही शाखेचे पदवीधर, उच्चशिक्षित असणारे पाल्य तसेच पारधी समाजातील किमान पाचवी पासून पुढे शिक्षण झालेला तरूण यासाठी पात्र असणार आहे. 35 वर्षेपेक्षा कमी वय असणार्‍यांना या मेळाव्यात भाग घेता येणार आहे.

आतापर्यंत पोलिसांच्या एक हजार 300 तर पारधी समाजातील सुमारे 200 युवकांनी नोंदणी केली असून अडीच ते तीन हजार तरूणांचा सहभाग अपेक्षीत आहे. 70 कंपन्यांचे प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्याच दिवशी नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button