अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन : श्रीरामपूर जिल्हा करा नाहीतर निवडणुकांवर बहिष्कार !

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूरला नवीन मुख्यालयाचा दर्जा दिला नाही तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा स्वाभिमानी जिल्हा कृती समितीने दिला.
शहरातील शासकीय विश्रामगृह येथे समितीची बैठक अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी आयोजित केली होती. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, मनोज आगे, मनसेचे बाबा शिंदे, भीमशक्तीचे संदीप मगर, अशोक उपाध्ये, राजेंद्र सोनवणे, मुक्तार शाह, तिलक डुंगरवाल, राहुल मुथा, विजय नगरकर, अरुण पाटील, सलीमखान पठाण, शेखर दुबय्या, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.
भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर जिल्हा केला जाणार नसेल तर सर्वांनी येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. त्याला सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. श्रीरामपूर जिल्ह्याच्या प्रश्नावर पक्षभेद विसरून राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय झाला. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार करण्यात आला.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून आणता येईल, श्रीरामाच्या नावाचा देशातील पहिला जिल्हा घोषित करण्याची मागणी पंतप्रधानांकडे करण्याची मागणी सुभाष त्रिभुवन यांनी केली.
दिवंगत गोविंदराव आदिक, जयंत ससाणे व विलासराव देशमुख या नेत्यांनी श्रीरामपूर जिल्ह्यासाठी निर्णय घेण्यापर्यंत प्रशासकीय पातळीवर कामगिरी बजावली, असे अशोक उपाध्ये म्हणाले.