दिवाळीची ऑनलाईन खरेदी; युवकाची फसवणूक

अहमदनगर- सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंग द्वारे अनेकांची फसवणूक होत आहे. स्त्री वस्त्र या वेबसाईट वरून ऑनलाईन शॉपिंगद्वारे साडी खरेदीत नगरच्या युवकाची फसवणूक झाल्याची फिर्याद तोफखाना पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
विराज विनय मुनोत (रा. रासने नगर, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनोत यांनी फेसबूक अकाउंटवरून स्त्री वस्त्र या वेब साइटवरून एक साडी बुक केली होती. बुकिंग केल्यानंतर ईकार्ट या कुरियर सर्विस कंपनी मार्फत ऑनलाइन डिलिव्हरी स्वरूपात ती साडी 1 सप्टेंबर रोजी मिळाली.
ईकार्ट कुरियर कंपनीचा डिलिव्हरी बॉय आकाश नरेश नागूल याने मुनोत यांच्याकडून 799 रूपये स्वतः च्या यूपीआय आयडीवर घेतले व पार्सलवरील कव्हर काढून पार्सल त्यांना दिले व तो घाईघाईने तेथून निघून गेला.
मुनोत यांनी पार्सल उघडून बघितले असता जी साडी बुक केली, ती साडी नव्हती. अंत्यत निकृष्ट दर्जाची दुसरीच साडी पार्सलमध्ये होती. त्यांनी डिलिव्हरी बॉयशी संपर्क साधून निकृष्ट दर्जाची साडी परत करावयाची असल्याचे सांगताच त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मुनोत यांना ऑर्डर रिजेक्ट केल्याचा मेसेज आला. डिलिव्हरी बॉय आकाश नरेश नागूल याने फसवणूक केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.