इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरूणीला ब्लॅकमेल करत अत्याचार

इन्स्टाग्रामवर मैत्री करून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरूणी बरोबर बळजबरीने अत्याचार करणाऱ्या बीड जिल्ह्यातील तरूणाला लोणी पोलिसांनी औरंगाबाद येथून जेरबंद केला.
सप्टेंबर २०२१ पूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर या तरुणाने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलीशी मैत्री करण्यासाठी लोणी गाव निवडले. लोणीच्या बसस्थानकावर त्यांची भेट झाली. लोणीतल्याच एका हॉटेल मध्ये तिला नेऊन तिचे फोटो काढले. फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करून सप्टेंबर ते डिसेंबर चार महिने तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.
मुलीने मात्र आपल्या घरी ही गोष्ट सांगितली नाही. मात्र या तरुणाने विवाहित असूनही मुलीच्या वडिलांना फोटो पाठवून तिच्याशी लग्न करण्यासाठी धमक्या दिल्या.
शेवटी त्याच्या त्रासाला कंटाळून त्याच्याविरुद्ध लोणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. आरोपी माऊली उर्फ ज्ञानेश्वर आत्माराम गायके, वय -२५ रा.लोणगाव ता.माजलगाव जि. बीड याचा पोलिसांनी कसून शोध घेऊन त्याला औरंगाबाद येथून अटक केली. त्याच्या विरुद्ध पीडित मुलीच्या तक्रारीवरून २२९/२०२२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलीकडच्या काळात शिक्षित मुली फेसबुक, इन्स्टाग्राम आणि समाज माध्यमावर मैत्री करून अत्याचाराच्या बळी ठरत असल्याच्या अनेक घटना समोर आल्याने पालक वर्गाची चिंता वाढली आहे.