तुमच्या घरात लहान मुले आहेत ? त्यांना चॉकलेट आणि गोड पदार्थ खायला देताय मग ही बातमी वाचाच..
गोड पदार्थ खाणे, व्यवस्थित चूळ न भरणे, ब्रश न करणे, झोपताना गोड तसेच इतर पदार्थांचे सेवन करणे आदी कारणांमुळे लहान मुलांचे दात किडत असल्याचे दंतरोग तज्ज्ञांनी सांगितले.

Health News : लहान मुलांमध्ये दातांच्या समस्या खूप वाढल्या आहेत. दातांना कीड लागली तर बालवयातच दाढ काढावी लागते. अतिप्रमाणात चॉकलेट,
गोड पदार्थ खाणे, व्यवस्थित चूळ न भरणे, ब्रश न करणे, झोपताना गोड तसेच इतर पदार्थांचे सेवन करणे आदी कारणांमुळे लहान मुलांचे दात किडत असल्याचे दंतरोग तज्ज्ञांनी सांगितले.
लहान मुलांच्या दंत आरोग्याबाबत पालकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांना चॉकलेट, बिस्किट, गोड अथवा चिकट पदार्थ द्यावयाचे असल्यास ते जेवणाआधीच द्यावेत, जेवण झाल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी मुलांना कुठलाही पदार्थ खाण्यास देऊ नये.
७ ते १४ वर्षापर्यंत दुधाचे आणि परत येणारे दात एकत्र असतात. त्यामुळे मुलांकडून व्यवस्थित ब्रश करून घेण्याबाबत पालकांनी काळजी घ्यावी.
काय काळजी घ्यावी ?
■ मुलांचे दात आणि तोंडाची स्वच्छता नीट केल्यास त्याच्या दातांतील जंत टाळता येऊ शकतात. ३ ते ५ वर्षे वयाच्या मुलांच्या दातांना कीड होण्याची अधिक शक्यता असते. कारण दुधाच्या दातांचे ‘इनॅमल पातळ आणि मऊ असते.
त्यांच्यावर पोकळी निर्माण होण्याची शक्यता असते. दातांमध्ये पोकळी निर्माण झाल्यामुळे, त्यांचा त्रास जाणवण्याचा धोका असतो, म्हणूनच दातांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. लहान मुलांचा ब्रश करताना तो आडवा न धरता उभा व्यवस्थित सर्व बाजूने ब्रश करणे आवश्यक आहे.
लहान वयातच दाढ काढावी लागतेय
■ आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, हे मुलांना उमगत नाही जर पालकांनी मुलांच्या दाताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर समस्या वाढत जाते.
■ डॉक्टरांकडून एक तर त्या मुलांची दाढ काढावी लागते, अन्यथा त्यात सिमेंट, चांदी भरण्याची वेळ येते.
लहान मुलांचे दात का किडतात ?
मुलांच्या दातांना कीड लागू नये म्हणून अनेक आई-वडील आपल्या मुलांना जास्त गोड देत नाहीत. परंतु अनेकदा गोड पदार्थ, चॉकलेट कमी दिले, तरीही त्याच्या दातांना कीड लागतच असते. त्याचे कारण असे की,
जेवण केल्यानंतर, दूध पिल्यानंतर अथवा कुठलाही पदार्थ खाल्ल्यानंतर मुले व्यवस्थित चूळ भरत नाहीत तसेच ब्रशी व्यवस्थित करत नाहीत. झोपताना मुलांना काही स्वायला दिले तरीही दात किडण्याचा धोका अधिक संभवतो.