शिवसैनिकांचे दुहेरी हत्याकांड; तपासात आर्थिक तडजोड झालाचा आरोप, कुटुंबियाचे आझाद मैदानावर उपोषण

केडगाव येथे दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती. या घटनेला येत्या 4 एप्रिल रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेतील आरोपींना जामीन मंजूर झाला असून, यामध्ये आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोप शिवसैनिक कै. संजय कोतकर व कै. वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
त्यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपींना जामिनासाठी अधिकार्यांनी आर्थिक तडजोड केली.
आर्थिक हित जोपासून चुकीची कागदपत्रे सादर करून आरोपींना जामीन मंजूर होण्यासाठी मदत करणार्या अधिकार्यांवर ठपका उपोषणकर्त्यांनी ठेवला आहे.
अशा अधिकार्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर करवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. उपोषणात संग्राम संजय कोतकर, प्रमोद आनंदा ठुबे, किसन रमेश ठुबे, देवीदास भानुदास मोढवे, अनिता वसंत ठुबे, गणेश रंगनाथ कापसे,
नगरसेविका सुनीता संजय कोतकर आदी सहभागी झाले आहेत. दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास सीआयडीकडून काढून तो अहमदनगर एलसीबीकडे देण्यात यावा,
जाणीवपूर्वक आरोपींना जामीन होण्यासाठी आर्थिक तडजोड करून आरोपींना मदत करणार्या अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.