निष्क्रिय पोलीस यंत्रणेमुळे चोरट्यांचा धुमाकूळ वाढला…शेती साहित्यांच्या चोरीने बळीराजा चिंताग्रस्त

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रात चोर्यांचे सत्र सुरूच आहे. नुकतेच हनुमानवाडी येथून शेतकरी सागर जितेंद्र गिरमे यांच्या मालकीच्या शेतांतून दहा स्प्रिंकलरचे पाईप व अन्य साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
यामुळे या परिसरात चोरे मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील हनुमानवाडी येथे गिरमे यांचे 18 एकर क्षेत्र असून त्यापैकी अडीच एकर सोयाबीनची लागवड येथील शेतकरी हरिश कुर्हे यांनी केली आहे. दुपारी कुर्हे शेतात सोयाबीनला पाणी लावायला आले असता त्यांना पाईप व अन्य साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात आले.
दरम्यान याबाबत कुर्हे यांनी बेलापूर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष बाब म्हणजे एकलहरे कार्यक्षेत्रात दोन महिन्यांपासून दर चार दिवसाला चोरट्यांचा धुमाकूळ चालू असून चोर्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चोर्यांचे तपास पोलीस यंत्रणेला लावता न आल्याने पोलिसांबद्दल परिसरात तिव्र संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यात दरदिवशी होणाऱ्या चोऱ्यांच्या घटनां पाहता चोरट्यांनाही पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं दिसून येत आहे.तसेच चोरट्यांचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. परिसरात वारंवार अशा चोरीच्या घटना घडत असल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे.