शॉर्ट सर्किटमुळे सरपंचांचा 4 एकर ऊस जळून खाक

नेवासा तालुक्यातील खेडलेकाजळी येथे विजेच्या तारा उसाच्या शेतावरून गेल्याने शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत चार एकर ऊस जळून खाक झाला आहे. जळालेला सदरचा ऊस खेडलेकाजळीचे सरपंच बाळासाहेब कोरडे यांच्या मालकीचा आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, खेडले काजळी शिवारात कमलबाई येडु कोरडे यांचा दोन एकर तर अलकाबाई बाळासाहेब कोरडे यांचा दोन एकर असे एकूण चार एकर ऊस गळीतासाठी उभा होता. सोमवारी सायंकाळी काही जणांना उसातून अचानक धूर येताना दिसला
उसाने क्षणार्धात पेट घेतल्यानंतर याबाबत कोरडे यांना माहिती देण्यात आली. कोरडे घटनास्थळी येऊपर्यंत सदरचा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता.
चार एकर उसाच्या शेतावरून वीज वितरण कंपनीच्या विजेच्या तारा गेलेल्या आहेत या तारा एकमेकांवर घासून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे उसाने पेट घेतला असल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सरपंच बाळासाहेब कोरडे यांनी सांगितले.
दरम्यान घटनेचा पंचनामा करून वीज वितरण कंपनीने नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली.