अहमदनगरकाम धंदा

Ahmednagar Kanda Market : ह्या कारणामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल !

जिल्ह्यात २०२१-२२ च्या रब्बी हंगामात कांद्याचे बंपर उत्पादन झाले. परंतु कांद्याच्या भावात घसरण झाल्यामुळे चांगले उत्पादन होऊनही शेतकऱ्यांच्या हाती निराशा आली.

गत रब्बी हंगामात नगर जिल्ह्यात १ लाख ९० हजार ५२९ हेक्टरवर कांदा पिकाची लागवड झाली होती. यातून सुमारे ३७ लाख ९८ हजार १९५ टन कांद्याचे उत्पादन झाले.

प्रतिहेक्टरी उत्पादकता १९.९३५ टन एवढी मिळाली. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्याच्या कांदा उत्पादनात ९ लाख १३ हजार ७०३ टनांची वाढ झाली. कांद्याचे बंपर उत्पादन होऊनही जिल्ह्यात एक नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी १००० ते १२०० रुपये भाव मिळत आहे.

दोन नंबरच्या कांद्याला ७०० ते ९०० रुपये, तीन नंबर कांद्याला ५०० ते ६०० रुपये, तर जोड कांद्याला सरासरी २०० ते ३०० रुपये भाव मिळत आहे. दररोजच्या जेवणात आवश्यक असलेला कांद्याला वर्षभर मागणी असते.

भाव घसरल्याने तो कधी शेतकऱ्यांना रडवतो, तर भाववाढीमुळे ग्राहकांना रडवतो. देशाच्या कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा नाशिक जिल्ह्याचा आहे. नाशिकनंतर अहमदनगरमध्ये सर्वाधिक कांदा लागवड केली जाते.

२०२०-२१ च्या रब्बी हंगामात नगर जिल्ह्यामध्ये १ लाख ५३ हजार ९७७ हेक्‍टरवर कांदा लागवड झाली होती. यातून जिल्ह्यामध्ये २८ लाख ८४ हजार ४९२ टन कांद्याचे उत्पादन झाले. प्रतिहेक्टरी उत्पादकता १८.७३४ टन मिळाली.

२०२१-२२ रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख ९० हजार ५२९ हेक्‍टरवर कांदा पिकाची लागवड केली होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये रब्बी हंगामात लावलेल्या कांद्याची काढणी फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये करण्यात आली. यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी उत्पादकता १९.९३५ टन एवढी मिळाली.

या रब्बी हंगामात जिल्ह्यात एकूण ३७ लाख ९८ हजार १९५ टन कांद्याचे उत्पादन झाले. परंतु कांद्याचे भरघोस उत्पादन होऊनही कांद्याला भाव कमी मिळत असल्याने शेतकरी हवालदिल आहेत.

नगर जिल्ह्यात मागील रब्बी हंगामामध्ये कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले. सन २०२१-२२ च्या रब्बी हंगामात जिल्ह्याच्या कृषी विभागाने जिल्ह्यात पीक कापणीचे २६१ प्रयोग राबवले.

यातून संकलित केलेल्या नोंदीतून जिल्ह्याच्या कांद्याची प्रतिहेक्टरी उत्पादकता काढण्यात आली. प्रतिहेक्टरी उत्पादकता १९९३५.२७० किलोग्रॅम एवढी निघाली, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button