काम करणारे खा. लोखंडे यांच्या बरोबरच जनता राहील…

शिर्डी मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवून सतत जनसेवेला अग्रक्रम देणाऱ्या खासदार सदाशिव लोखंडे यांना मतदारसंघातील दौऱ्यावर न बोलाविणारे पुढारी व अधिकारी यांचा अकोले शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला
अकोल्याचे नगरसेवक प्रमोद मंडलिक, शिवसेनेचे अकोले तालुकाप्रमुख मच्छद्रिं धुमाळ, उप जिल्हाप्रमुख रामहरी तिकांडे, प्रदीप हासे, महेश नवले, संतोष मुतडक, नितीन नाईकवाडी, महेश देशमुख, गणेश कानवडे आदींनी खा. लोखंडे यांच्या कामाचा लेखाजोखा मांडला.
त्यांनी सांगितले, की निळवंडे धरणाच्या खोळंबलेल्या कालव्यांसाठी जलदिंडी आंदोलन करून खा. लोखंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. खासदारकी पणाला लावत केंद्र सरकारमार्फत कालव्यांच्या कामांसाठी भरीव तरतूद करून निधी मिळवला.
कालव्यांची कामे रोखलेल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, वादविवाद मिटविले व पुन्हा काम चालू केले. महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत प्रमुख असून खा. लोखंडे यांच्यावर विशेष मर्जी असलेले उद्धवराव ठाकरे मुख्यमंत्री आहेत.
त्यामुळे पुढाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी राजकिय वागणे यापुढे तरी सोडून द्यावे. लोकाभिमुख काम करणारे खा. लोखंडे यांच्या बरोबरच जनता राहील, असा विश्वास व्यक्त करत आम्ही अकोले तालुक्यातील शिवसैनिक खा. लोखंडे यांना सदर दौऱ्यावर न बोलवणाऱ्या अधिकारी आणि सत्तेत राहून दुजाभाव करणाऱ्यांचा जाहीर निषेध करीत आहोत असे स्पष्ट केले.