कत्तलखान्यात चालविलेल्या आठ गायी…नंतर झाले असे काही

राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे दिनांक २९ मे रोजी राहुरी पोलिसांनी कारवाई करत कत्तलखान्यात चालविलेल्या आठ गायींची सुटका केली, तसेच राहाता तालुक्यातील दोन आरोपींना ताब्यात घेऊन गजाआड केले.
सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी मोहम्मद नूर कालू शेख (वय ३०) व अमजद फकीर मोहम्मद शेख (वय ३०, दोघे राहणार ममदापूर, तालुका राहाता) हे दिनांक २९ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील एक महिंद्रा कंपनीची पिकअप गाडीमध्ये आठ जनावरांना क्रूर व निर्दयपणे पिकअप गाडीत कोंबून वाहतूक करीत होते.
राहुरी पोलिसांचा खबर मिळताच, त्यांनी राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसादनगर येथे सदर पीकअप गाडी व दोन आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी पिकअपमधील आठ जनावरांची सुटका करून त्यांना गोशाळेत पाठविण्यात आले.
या कारवाईदरम्यान ५ हजार रुपये किंमतीची गावरान गाय, १५ हजार रुपये किंमतीच्या चार कालवडी, ३० हजार रुपये किमतीच्या तीन गायी तसेच १ लाख ५० हजार रुपये किमतीची पिकअप असा एकूण २ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
हवालदार सचिन ताजणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद नूर कालू शेख व अमजद फकीर मोहम्मद शेख या दोघांवर गुन्हा रजिस्टर नंबर ४३१/२०२१ नुसार प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०चे कलम ३ व ७ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.