अहमदनगर

घरगुती वादातून आठ वर्षीय बालकाचे अपहरण; पोलिसांनी 24 तासात लावला शोध

अहमदनगर- सोलापूर रोडवरील केदारे वस्ती येथून अश्विन परसराम क्षेत्रे या आठ वर्षीय मुलाचे रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते.

याप्रकरणी त्याचे वडिल परसराम गुलाब क्षेत्रे (वय 31) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अपहरण झालेल्या आठ वर्षीय अश्‍विनचा 24 तासात शोध घेऊन त्याला सुखरूप नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली.

याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागेश चंद्रभान भिंगारदिवे (वय 35 रा. दरेवाडी, ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. अहमदनगर शहरातील स्टेट बँक चौकातून अपहरण करणारा संशयीत नागेश चंद्रभान भिंगारदिवे याला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली. तसेच पोलीस कारवाईच्या भीतीने त्याने सदर मुलाला अहमदनगर रेल्वे स्टेशन वरून एका रेल्वेमध्ये बसवून दिल्याचे तपासात समोर आले.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. पुणे रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही पुण्याला रवाना झाले.

सोमवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण झालेल्या मुलाला ताब्यात घेतले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या मुलाला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button