शासकीय निधीचा अपहार भोवला; दोन अधिकाऱ्यांना न्यायालयाने दिली शिक्षा

अहमदनगर- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, नगर या महामंडळामध्ये दोन कोटी 50 लाखांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी.बी.रेमणे यांनी दोन अधिकाऱ्यांना सहा वर्षे दोन महिने शिक्षा ठोठावली आहे.
महामंडळाचा तत्कालीन जिल्हा व्यवस्थापक अशोक विश्वनाथ नागरे व बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपव्यवस्थापक योगेश बाबासाहेब सानप यांना शिक्षा ठोठावली आहे.
15 सप्टेंबर, 2012 ते 30 मार्च, 2013 या कालावधीत नऊ जणांनी संगणमत करून 50 बोगस लाभार्थी अर्जदारांचे बनावट कागदपत्रे तयार करून ते वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, नगर ‘एनबीसीएफडीसी’, नवी दिल्ली योजनेअंतर्गत कर्ज मिळणेकरीता दाखल करून सदर 50 बोगस लाभार्थ्यांचे नावे प्रत्येकी पाच लाख रूपये प्रमाणे कर्ज मंजूर करून घेतले होते.
त्यानंतर वसंतराव महामंडळाचे अलाहाबाद बँकेतील खात्याचे 50 धनादेश घेवून ते बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेतून वटवून घेतले व महामंडळाची दोन कोटी 50 लाख रूपयांची फसवणुक केली असल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
यातील आरोपी अशोक विश्वनाथ नागरे व आरोपी योगेश बाबासाहेब सानप यांना न्यायालयाने दोषी धरून शिक्षा ठोठावली असून इतर सात जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण 34 साक्षीदार यांची साक्ष नोंदविण्यात आली. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. निलम अमित यादव यांनी कामकाज पाहिले. तसेच पोलीस अंमलदार याकुब सय्यद, अशोक शिंदे, वसुधा भगत यांनी सहाय्य केले.