अहमदनगर

हायकोर्टाचे आदेश येताच मनपाने काढले अतिक्रमण; नागरिकांचा श्‍वास मोकळा

अहमदनगर – उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश देताच महानगरपालिकेने तारकपूर बसस्थानकासमोर वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या घराकडे जाणार्‍या रस्त्यावरील अतिक्रमण काढले. मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. लोखंडी गेट व भिंत टाकून रस्ता बंद करण्यात आला होता.

 

शहरातील तारकपूर बसस्थानकासमोर द कोर्टयार्ड ही इमारत आहे. या इमारतीच्या ई विंगमध्ये 125 तर सी विंगमध्ये 35 फ्लॅट आहेत. सी आणि ई विंगकडे जाणार्‍या रस्त्यावर मोहन थोलार आणि प्रियंका थोलार यांनी लोखंडी गेटसह सिमेेंटच्या भिंतीचे बांधकाम केले होते. यामुळे सी आणि ई विंगमध्ये नागरिकांना ये-जा करण्यास अडचण निर्माण झाली होती. रस्त्यावरच अतिक्रमण केल्याने सी आणि ई विंगमधील नागरिकांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी पुर्ण होऊन न्यायालयाने अतिक्रमण पाडण्याचे आदेश दिले होते.

 

त्यानंतर या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयात सुनावणी पुर्ण होऊन महापालिकेला अतिक्रमण पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने मंगळवारी दुपारी जेसीबी मशिनच्या सहाय्याने अतिक्रमण काढून नागरिकांना रहदारीसाठी रस्ता मोकळा करून दिला. दरम्यान, बांधकाम करण्यात आलेली भिंत ही माझ्या वैयक्तिक मालकीच्या जागेत असल्याचे थोलार यांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button