अहमदनगर

जमिनीच्या व्यवहारात वकीलांनाही फसवलं; पाच जणांविरूध्द गुन्हा

अहमदनगर- जमिनीचे खरेदीखत झालेले असतानाही ती दुसर्‍याला विक्री करून नगर शहरातील अ‍ॅड. गजेंद्र नानाजी दांगट (वय 36 रा. नालेगाव) यांची फसवणूक केलाचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी अनुश्री सागर काबरा, सागर अशोक काबरा (दोघे रा. तापीदास गल्ली, आडतेबाजार), विवेक विठ्ठल त्र्यंबके (रा. ढोरगल्ली, जाधव मळा, बालिकाश्रम रोड, सावेडी), रश्मी कमल चावला व कमल मनमोहन चावला (दोघे रा. सिंध्दी कॉलनी, तारकपूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

सागर काबरा व विवेक त्र्यंबके यांनी अ‍ॅड. दांगट यांना अनुश्री काबरा हिचे नावावर असलेली वाळुंज (ता. नगर) शिवारातील गट नं 152/3 चे 40 आर पैकी 20 आर शेत जमिन 7 सप्टेंबर, 2021 रोजी रजिस्टर साठेखत व जनरल मुखत्यारपत्र दस्त क्र 5335/2021 लिहून नोंदवून दिला होता. अ‍ॅड. दांगट यांनी रोख व धनादेशस्वरूपात अनुश्री व सागर काबरा यांना आठ लाख 21 हजार रूपये दिले होते.

 

काबरा दांपत्यांनी अ‍ॅड. दांगट यांना 7/12 उतार्‍यास नोंद करून खरेदीखत त्यांच्या नावे लिहून नोंदवुन दिले नाही. अ‍ॅड. दांगट यांनी वाळुंज तलाठी कार्यालयात अधिक चौकशी केली असता त्यांना विक्री केलेली शेत जमीन सागर काबरा, अनुश्री काबरा व विवेक त्र्यंबके यांनी रश्मी कमल चावला व कमल मनमोहन चावला यांना सोबत घेवून स्वत: चे नावे खरेदी करून घेतली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

 

अ‍ॅड. दांगट यांनी सदर मिळकतीचे आणखी काही व्यवहार झाले आहे का, याची माहिती घेतली असता वरील नमुद मिळकत ही अनुश्री काबरा व सागर काबरा यांनी सुभाष हस्तीमल कटारिया यांना 29 सप्टेंबर, 2021 रोजी खरेदीखत दस्त क्र 5881/2021 नुसार तीच मिळकत विक्री केल्याचे समोर आले आहे. आपली फसवणूक झाली असल्याचे अ‍ॅड. दांगट यांच्या लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button