अहमदनगरलेटेस्ट

अहमदनगर जिल्ह्यात खळबळ : लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणारी टोळी उघडकीस

लग्नाचे आमिष दाखवून मुलाची व मुलाच्या नातेवाईकांची फसवणूक करणारी टोळी उघडकीस आली. लग्नात जी वधू म्हणून उभी राहिली होती, तिचे पहिले लग्न झाले असून तिला दोन अपत्य असल्याचे समोर आले.

याप्रकरणी पत्नी म्हणून वावरणारी नववधू दीपाली बडदे, सासवड, पुणे, बापू झुंबर दातीर, औटेवाडी, श्रीगोंदे, कुंडलिक शाहू चव्हाण, अनिता भगवान गिरे, दोघे रा. औरंगाबाद व वैशाली या पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील ज्ञानेश्वर मोहन ढवळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. यातील बापू दातीर याने फिर्यादीचे वडील मोहन ढवळे यांना तुमच्या मुलाचे लग्न करायचे असल्यास तुम्ही व मुलगा मुलीला पहायला श्रीगोंदे येथे या, असे सांगितले.

त्यावर ढवळे कुटुंबीय १६ जून रोजी मुलगी पाहण्यास श्रीगोंदे येथे आले. मुलगी पसंत झाल्यानंतर १९ जून रोजी हा विवाह पार पडला. हे लग्न जमवताना आरोपी दातीर याने मुलाच्या वडिलांकडून दोन लाख रुपये घेतले.

दोन दिवस गेल्यानंतर वधू सतत फोनवर कुणाशी तरी बोलत असल्याचे मुलाच्या आईच्या लक्षात आले. त्यांनी तिच्याकडचा मोबाइल काढून घेतल्यानंतर नववधू ढवळे कुटुंबीयांवर चिडचिड करू लागली.

तिने माझी आई आजारी असल्याचे सांगून पळून जाण्याचा बहाणा केला. ढवळे कुटुंबीयातील सदस्यांनी सोबत येण्याची तयारी दर्शवली. त्याच दरम्यान आरोपी वैशाली हिने मी दीपालीला न्यायला येते, असे सांगितले.

त्यावर ढवळे कुटुंबीयांनी त्यास नकार दिला. आपला कुठलाच प्लॅन यशस्वी होत नसल्याचे लक्षात येताच नववधू दीपालीने आपल्याला इथे रहायचे नसल्याचे सांगत तिथून जाण्याचा प्रयत्न केला.

ढवळे कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना कैफियत कथन केली. ढिकले यांनी याप्रकरणी लक्ष घालत वरील आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

पुढील तपास श्रीगोंदे पोलिस करत आहेत. या टोळीने विविध ठिकाणी अशा प्रकारची मोडस वापरून तरुण मुलांना लाखो रुपयांचा गंडा घातला असण्याची शक्यता आहे.

वैशाली नामक आरोपी या मुलीसोबत तीन दिवस या ठिकाणी वास्तव्यास होती. प्रकरण उघडकीस आल्यानंतरही ती याच भागात होती. या प्रकरणाने मात्र खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button