अहमदनगर

चेक न वटवणे पडले महागात..! गुरूजीला न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

आपण दैनंदिन जीवनात व्यवहार करताना अनेकदा समोरच्या व्यक्तीला चेक देत असतो, जेणेकरून संबंधित व्यक्ती त्या तारखेला त्याचा व्यवहार पूर्ण करेल. मात्र चेक न वटल्यास चेक देणाऱ्यावर कारवाई केली जाते.

मात्र तरीदेखील अनेकजण चेक वटण्याकडे कानाडोळा करतात. परंतु असाच चेक न वटवणे एका गुरजीला चांगलाच महागात पडल्याची घटना घडली आहे.

यात उसने घेतलेल्या दोन लाखांच्या रकमेचा धनादेश न वटल्याने एक वर्षाचा सश्रम कारावास व ४ लाखांचा दंड अशी शिक्षा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावली. या प्रकणातील आरोपी हा एका शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील शिवदत्त धस यांनी शशिकांत पाटील यांना दोन लाख रुपये उसने दिले होते. ते परत देताना पाटील याने धस यांना दोन लाखांचा धनादेश दिला होता.

परंतु, हा धनादेश न वटल्याने शिवदत्त धस यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणाचा निकाल देताना न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाटील यास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा त्याचबरोबर धनादेश रकमेकरिता ४ लाखांचा दंडही ठोठावला. एवढेच नव्हे तर दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्यांच्या अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button