फेसबुकवरील जाहिरातीला भुलले आणि फसले; व्यवसायिकाची अशी झाली फसवणुक

अहमदनगर- फेसबुकवर माती रत्नकला क्ले या नावाने जाहिरात पाहिली, त्या जाहिरातीवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करून व्यवहार केल्यानं एका व्यावसायिकाची फसवणूक झाली आहे. कमी भावात मातीचे भांडे देण्याचे आमिष दाखवून 96 हजार रूपयांची फसवणुक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश राज्यातील राहुल वर्मा नामक व्यक्तीविरूध्द येथील कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवसायिक सुशील अशोक देशमुख (वय 41 रा. नेप्ती नाका, नालेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
सुशील देशमुख यांचा वडिलोपार्जीत कुंभाराचा (गाडगे विकण्याचा) व्यवसाय आहे. त्यांनी 23 नोव्हेंबर, 2022 रोजी फेसबुकवर माती रत्नकला क्ले या नावाने जाहिरात पाहिली, त्या जाहिरातीवर दिलेल्या मोबाईल नंबरवर त्यांनी संपर्क केला असता सदर मोबाईल धारक राहुल वर्मा म्हणाला की, माझी माती रत्नकला क्ले या नावाने कंपनी आहे. त्यानंतर त्याने देशमुख यांच्या व्हॉट्सअपवर सर्व माती भांड्यांचे विविध फोटो व त्यांच्या किंमती पाठविल्या. त्यातील काही मातीचे भांडे देशमुख यांना पसंत पडल्याने त्याबाबत व्यवहार झाला.
पसंद पडलेले भांड्याची एकुण रक्कम 91 हजार रूपये ठरली होती. तसेच वाहतुकीचा पाच हजार रूपये देण्याचे ठरले. त्यानंतर राहुल वर्मा याने दिलेल्या बँक खाते नंबरवर देशमुख यांनी त्यांच्या बँक खात्यातून 9 डिसेंबर, 2022 रोजी आरटीजीएस मार्फत एकुण 96 हजार रूपये पाठविले.
त्यानंतर काही दिवस देशमुख यांनी ऑर्डर केलेला माल येईल याची वाट पाहिली परंतु माल आला नाही म्हणून त्यांनी सदर इसमास वेळोवेळी फोन करून संपर्क करत होतो. त्यावेळी तो, हॉस्पिटलमध्ये आहे असे वेळोवेळी उडावा उडवीचे उत्तर देत होता. त्यानंतर त्याने देशमुख यांचा फोन उचलायचे बंद केले. देशमुख हे 23 डिसेंबर, 2022 रोजी त्याने दिलेल्या पत्त्यावर खुर्जा (राज्य उत्तर प्रदेश) या ठिकाणी समक्ष जावून चौकशी केली परंतु सदर नावाची कंपनी व तो इसम तेथे नसल्याचे त्यांना कळले. आपली फसवणुक झाल्याचे लक्ष्यात येताच त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात 4 जानेवारी, 2023 रोजी फिर्याद दिली आहे. कोतवाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.