अहमदनगर

वाहतुक कोंडी रोखण्यात अपयश; निरीक्षक नियंत्रण कक्षात, दोन कर्मचार्‍यांवरही झाली कारवाई

अहमदनगर- अहमदनगर शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली तर एका प्रकरणातील चौकशीमध्ये दोषी आढळून आलेल्या दोन पोलीस अंमलदारांचीही मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. अवजड वाहनांची शहरातुन होणारी वाहतुक, सतत होणारी वाहतुक कोंडी यामुळे कायमच चर्चेत असलेल्या वाहतुक शाखेच्या कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

निरीक्षक भोसले यांच्या जागी सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी करण्यात आले आहे. अहमदनगर शहरात सध्या उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. उड्डाणपूलाच्या कामामुळे शहरात वाहतुक कोंडी होत आहे. अवजड वाहनांना प्रवेश बंदी असतानाही शहरातून सर्रास अवजड वाहनांची वाहतुक होत आहे. यामुळे वाहतुक शाखेविषयी तक्रारी वाढल्या होत्या.

अवजड वाहतुकीवरून शहराचे आ. संग्राम जगताप यांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशाराही दिला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी देखील वाहतुक शाखेला भेट देत झाडाझडती घेतली होती. कामगिरीमध्ये सुधारणा करण्यास एक महिन्याची मुदत दिली होती. दरम्यान वाहतुक शाखेच्या वाढत चाललेल्या तक्रारीमुळे अधीक्षक पाटील यांनी निरीक्षक भोसले यांची बदली केली आहे.

पोलीस अंमलदार संजय गवळी आणि मोहम्मद अली सय्यद यांच्याविषयी एका प्रकरणात तक्रार झाली होती. त्यांची चौकशी करण्याचे आदेश अधीक्षक पाटील यांनी पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकडे यांना दिले होते. चौकशीमध्ये दोषी आढळून आलेल्या अंमलदार गवळी व सय्यद यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button