अहमदनगर

बनावट सोने तारण प्रकरण; पोलिसांची इंदौरमधून ‘त्याला’ घेतले ताब्यात

अहमदनगर- शहर सहकारी बँक व संत नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमधील बनावट सोनेतारण प्रकरणात सहभाग आढळून आलेला आणखी एक एजंट अनिकेत सुनील आर्य (रा. माळीवाडा, नगर) याला पोलिसांनी इंदौर (मध्यप्रदेश) येथून ताब्यात घेतले आहे.

 

दरम्यान गोल्ड व्हॉल्युअर अजय कपाले याला मदत करणारा अनिकेत आर्य हा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच नगरमधून पसार झाला होता. त्याच्या नातेवाईकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार देखील दिली होती. त्याने कपाले याला बनावट सोने तारण प्रकरणात मदत केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

 

शहर सहकारी बँक व संत नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमधील बनावट सोनेतारण प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शहर बँकेत आत्तापर्यंत 8933 ग्रॅम म्हणजे सुमारे नऊ किलो बनावट दागिने आढळून आले आहेत. या प्रकरणी 37 जणांविरूध्द गुन्हा दाखल असून, 3.22 कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तर संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीमध्ये 8564 ग्रॅम म्हणजे सुमारे साडेआठ किलो बनावट दागिने आढळून आले आहेत. या गुन्ह्यात 53 आरोपींचा समावेश असून आत्तापर्यंतच्या तपासणीत 2.88 कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

 

पसार झालेला आर्य याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. तो इंदौर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव, नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा पोलीस व इंदौर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अनिकेत आर्या याला ताब्यात घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button