कंपनीच्या भूलथापांना बळी पडून तेल काढण्याचे मशीन घेतले अन् फसले

अहमदनगर- एका कंपनीने तीन लाख रूपये घेऊन खाद्य तेल काढण्याचे मशीन दिली. परंतू करारनामा करून ठरल्याप्रमाणे कंपनीने माल न देता फसवणुक केली. या प्रकरणी सरिता अशोक पंडीत (वय 22 रा. वसंत टॉकीजजवळ, माळीवाडा) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बायोलाइफ अॅग्रो अॅण्ड फॅमिली वेलनेस कंपनीचे मालक बंडु किसनराव वाघ (रा. आहीरे गाव, वारजे, माळीवाडी, पुणे), अमोल पोपटराव मेटे (रा. सोमवार पेठ, पुणे), निता रामदास पाटील (रा. शिंदे मळा, सावेडी, नगर), निलिमा अनिल खाटेकर (रा. बालिकाश्रम रोड, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बायोलाइफ अॅग्रो अॅण्ड फॅमिली वेलनेस कंपनीने एक स्किम काढली होती.
त्यानुसार कंपनीला तीन लाख रूपये द्यायचे व त्याबद्दल्यात कंपनी खाद्य तेलाची मशीन देऊन जे खाद्य पदार्थ कंपनी देणार त्याचे तेल काढून द्यायचे व त्याबद्दल्यात कंपनी महिन्याला 25 हजार रूपये व जे वीज बिल आले असेल ते देणार, अशी ती स्किम होती. सदर कंपनीचे कागदपत्रांची फिर्यादी यांनी पडताळणी केली असता सदरची कंपनी बंडु वाघ व अमोल मेटे यांच्या नावे असल्याचे माहिती मिळाली होती.
फिर्यादी मशीन घेण्यासाठी तयार झाले. बंडु वाघ याने कंपनी स्किम प्रमाणे करारनामा केला. त्यावेळी निता पाटील, निलिमा खाटेकर हजर होत्या. बंडु वाघ याने कंपनीच्या दिलेल्या खात्यावर फिर्यादी यांनी तीन लाख रूपये पाठविले होते.
दरम्यान करारनाम्यात ठरल्याप्रमाणे मशीन देऊन दोन महिने कंपनीने माल दिला व तयार माल पण घेऊन गेले. परंतू दोन महिन्यानंतर कंपनी प्रतिनिधींनी टाळाटाळ करून फोन बंद केले. दरम्यान फिर्यादी व त्यांच्या पतीने माहिती काढली असता नगरमधून विजय संताजीराव औटी, मनिषा कैलास हुंडेकरी, सुजीत रत्नाकर खरमाळे, शितल अभयसिंग भगत यांनी देखील पैसे भरून मशीन घेतले होते. त्यांची देखील फसवणुक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.