पाणबुडी मोटार चोरीच्या घटनेने केळेवाडीतील शेतकरी संतप्त; एकाच दिवसात 12 मोटारी लंपास

संगमनेर तालुक्यातील केळेवाडी येथील पाझर तलावातून इलेक्ट्रिक पाणबुडी मोटारीची चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच या तलावातून एक दोन नव्हे तर तब्बल 12 शेतकर्यांच्या 12 इलेक्ट्रिक पाणबुडी मोटारीवर चोरटयांनी डल्ला मारला आहे.
वाढत्या चोरीच्या घटनांमुळे आता परिसरातील शेतकरी चांगलेच संतप्त झाले असून मोटारी चोरणार्या चोरट्यांचा पोलिसांनी त्वरीत शोध लावावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
या चोरींमुळे बळीराज हवालदिल झाला आहे तर दुसरीकडे चोरट्याने सुगीचे दिवस येऊ लागल्याचे दिसून येत आहे.
या शेतकऱ्यांच्या मोटारींची झाली चोरी बोटा गावांतर्गत असलेल्या केळेवाडी येथे उत्तम नाथा लामखडे, मुरलीधर लक्ष्मण कुर्हाडे, गणेश भिमाजी लामखडे, विलास बाळकू लामखडे, राजेंद्र रामदास लामखडे, अंकुश राणू लामखडे, भरत धोंडीभाऊ लामखडे, विकास बबन कुर्हाडे, जयराम सखाराम लामखडे, बाळासाहेब कोंडीभाऊ लामखडे, भाऊ रेवजी लामखडे या सर्व शेतकर्यांच्या मोटारी चोरी झाल्या आहेत.
दरम्यान या सर्व शेतकऱ्यांच्या विविध कंपनीच्या इलेक्ट्रिक पाणबुडी मोटारी केळेवाडीच्या पाझर तलावात होत्या. 16 ते 17 मे दरम्यान अज्ञात चोरट्याने तलावातून वरील सर्व शेतकर्यांच्या बारा इलेक्ट्रिक पाणबुडी मोटारी चोरून पोबारा केला आहे.
याप्रकरणी उत्तम लामखडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.